Wednesday, March 14, 2018

यारहो ...

दुष्मनांचा जोर आहे  वाढलेला यारहो
जीव माझा आरशावर भाळलेला यारहो

बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी
संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो

पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे?
कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो

ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो

कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो
प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो

एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ
बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो !

हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले
मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो

एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा
दोर परतीचा तसाही कापलेला यारहो

© विशाल वि. कुलकर्णी

Tuesday, February 20, 2018

त्यां हरवण्याचा नाद आहे...

कोण जाणे कोणता तो जागल्यांचा गाव आहे
अंधकाराच्या पटाला चांदण्यांचा डाग आहे

बोलला रस्ता हसूनी पांथिकाला शोधताना 
भेटला तर हात धर, त्यां हरवण्याचा नाद आहे

वाळवंटाच्या पलिकडे पावसाचे गाव असते
रोज हा खोटे दिलासे वाटण्याचा छंद आहे

कोण मुल्ला कोण काझी कोण कुठला रामलल्ला
बांग घंटा आरत्या अन जानव्याचा वाद आहे

 विशाल कुलकर्णी

लाज

लाज

पोर वेडी पोट पकडुन झोपते
माय दिसता भूक विसरुन नाचते

देव सांगा राहतो कुठल्या घरी?
बंद दाराच्या गजातुन शोधते

एकदा भेटायचे बाबा तुला
पत्र कोरे रोज हटकुन टाकते

ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे
पोर आहे..., माय विनवुन सांगते

भूक त्यां डोळ्यात आहे दाटली
वेळ थोडा पदर पसरुन मागते

भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा
त्याचसाठी देह वाटुन टाकते

रोज आत्मा खर्चते माझाच मी
लाज माझी मीच उधळुन सोडते

© विशाल विजय कुलकर्णी